'रंगपंचमी '
'रंगपंचमी '
रंगपंचमी
या सख्यांनो, या सयांनो
रंगाने या खेळू या
रंगीत रंगांनी रंगूनि
रंगांना या रंगवू या
लाल केशरी रंग उडवूनि
स्मरण करा त्या रक्ताचे
धारातीर्थी पडले जेथे
लाल मायभूमीचे ते
अंग अंग माखू दे केशरी
स्वार्थाची त्या करू या होळी
स्वयंस्फूर्तीने एकजुटीने
लाल माती ही फासू या
आणा आणा हो पिवळी झारी
नाजूक कोवळी हळद लाजरी
स्वाद स्वास्थ्यही देई साजिरी
लुटा पिवळी ही गम्मत न्यारी
शिशिर संपता वसंत येतो
हिरवी वनराई फुलवितो
समृध्दिच्या चाहुलीत मग
हिरव्या रंगी रंगू या
नवी नव्हाळी लाल कोवळी
कंच पाचूने ही नटलेली
शांतीसुखाच्या शोधासाठी
निळी निळाई उडवू या
निळ्या सागरी निळ्या आभाळी
गूढरम्यशा गर्द जांभळी
चिंतन करूनि या रंगांचे
रंगार्थातचि गुंगू या
उडवूनी रंगा भिजवी अंगा
तप्त तनमना तुम्ही शांतवा
एकच गहिरा भाव सुखाचा
श्र्वेत धवल तो पवित्रतेचा
होलिकोत्सवी मारा बोंबा
विसरून जाण्या द्वेषभावना
देशबंधुप्रेमाच्या रंगी
जागृतीत या रंगू या
