रंग मनाचे
रंग मनाचे


अवखळ तरल, अतल मन्मना, कसे तुला मी जाणू?
शब्दकुंचल्याने तुझे रंग मी, आज पाही रंगवू (1)
पर्जन्याने हर्षित सृष्टी, वसुंधरा सुखावते
हिरवी झाडे-हिरव्या वेली, मन माझे मोहरते (2)
रवि उगवता, रंग केशरी, शब्दकुंचले वर्णू किती?
उत्साहे कार्यान्वित करी, तन-मन येई फुलारुनी (3)
नितळ खळखळ मन्मन, प्रपातापरि कोसळते
शुभ्र-धवल किती तुरे, मना- मनांमधी डोलतसे (4)
मावळतीचे रविबिंब, नारिंगी क्षितिजावरी
अधिर प्रेमी युगलांना, संध्यानंदाने डुलवी (5)
धवल चंद्रकिरणांतुनी, रजनीगंधा दरवळते
प्रीत मनीची येता फुलुनी, मधुमीलन सुखावते (6)
रंग तुझे जळापरि, वेळ भेटता जशी जिथे
तत्क्षणी तू विरघळसी, दुग्धशर्करेपरि त्वरे (7)