रक्षाबंधन
रक्षाबंधन


नात्यांचं बंधन आहे रक्षाबंधन
आहे नातं सदा जन्मोजन्मीचे,
भाव भावनांचे, हळवे हे नाते
प्रेम बंधन नातं भाऊबहिणीचे..!!
आला सण हा राखी पौर्णिमेचा
ओवाळेन बहिण ती भाऊराया,
गोडधोड करून ती भरवीन
प्रेमाचा घास तया मुखाया..!!
लावून कुमकुम तिलक भाळी
औक्षिते तुज, बांधते रेशीमगाठी,
उजळू दे तुझं आयुष्य, बहरू दे
तुही रहा भाऊ माझ्या पाठी..!!
आहेस तू सीमेवर, देश रक्षणार्थ
अन् तुझ्या भेटीसाठी मी उभी दारात,
प्रत्येक रक्षाबंधन येतो आणि जातो
पण, तू न येता, तुझी आठव मनात..!!
फुलांचा सुगंध अन् मातीचा तो गंध
निरोप येतो तू सुरक्षित असल्याचा,
पुढल्या वर्षी नक्की येईन असं सांगून
पण, नंतर आभास होतो तू नसल्याचा..!!