पशूप्रेम
पशूप्रेम
नाते बाळ वासराचे
कसे जमले प्रेमाचे
नाही भीती जराशीही
सूत जुळे जिव्हाळ्याचे ।।१।।
किती विश्वासाने बाळ
तिथे टेकून बसले
मजा वासराला वाटे
त्याला पाहून हासले ।।२।।
शेण माती मऊमऊ
चोहीकडे पसरली
त्यात पाऊले दोघांची
किती मस्त उमटली ।।३।।
बोले गायीचं वासरू
देत खात्री लेकराला
जीव जीवात असेतो
मीच सांभाळीन तुला ।।४।।
टोपलीत असे चारा
तरी वासरू निवांत
शांत मजेत बसून
मस्त करिते रवंथ ।।५।।
ठेवा पशूवर प्रेम
तेच सोयरे बळीचे
दिले वासरू गाईने
उपकार माना तिचे ।।६।।
