प्रवासी
प्रवासी
इथे राजकारणाचे रोज नवे डाव रचले जातात
पंख छाटून पिंजऱ्यातून पक्षी सोडले जातात
लिलावात शेकडोने इमाने विकलेली पाहिली,
न झुकणारे पाचोळ्यापरी तुडवले जातात
लाख असतील सखे-सवंगडी सोबत जरी,
चार खांद्यावरच माणसं स्मशानात जातात
तुलाही मोजता येतील तारे आकाशातले परंतु,
तुझे आकडे नेहमी तुझ्या विरुध्दच जातात
बेरीज असो वा असो वजाबाकी आयुष्याची,
सत्कर्माचे हातचे नेहमीच पकडले जातात
द्यावी लागेल तुझ्या संयमाची परीक्षा आता,
मोक्षाच्या वाटा मद्याच्या दुकानावरून जातात
ही तर माझी सवय म्हणा वा दुर्गुण माझा,
वैऱ्यासाठीही देवापुढे हात जोडले जातात
तू असो वा मी असो, फक्त प्रवासी इथले,
जातानाही फक्त दुवाच सोबत जातात
