अहम
अहम
माझ्या रंगी रंगताना,
तुझा वेगळा रंग जपायला शिक.
सर्वस्वी माझं होताना सखे,
तुझ्या रंगातही रंगायला शिक...
माझ्यात विरून जाताना,
तुझी वेगळी छटा सोडायला शिक.
तुझ्या नानाविध रंगछटांमधून,
तुझीही वेगळी छटा सोडायला शिक...
"मी - मय" होशील, शंकाच नाही,
तुझा अहम जपून जगायला शिक
आभाळात हात घालून,
इंद्रधनुचे रंग निवडायला शिक...
मातीतून उगवून कल्पवृक्षापरी,
आपली उंची गाठायला शिक.
सागरतळातला रज:कण होऊन,
शिंपल्यातला मोती बनायला शिक...
माझ्यात एकजीव झालीस तरी,
तुझी वेगळी छाप सोडायला शिक.
शिकायचंय तुला बरंच काही,
आधी पंख तुझे उघडायला शिक...
