मागमूस
मागमूस
रिमझीम पाऊस ,
नभ पिंजला कापूस
ग्रीष्माळल्या धरतीचा ,
गंध मंद खरपूस
आता भिजायाचे चिंब ,
धुवून टाक हिरमूस
भेगाळल्या जखमांचा ,
नको ठेवू मागमूस
आज झिम्माड बरस ,
नको कोरडा जाऊस
पानावल्या रानोमाळी .
उगा बुजरा होऊस
शांतवावी तूच आता ,
वेड्या मनाची धुसपूस
आसावल्या पापणीचे ,
थेंब अलगद पूस
पुरवायची तुलाच ,
माझी भिजायची हौस
तृषावल्या मनासाठी ,
तुला व्हायचं पाऊस ...
