स्त्री जन्मा...
स्त्री जन्मा...
ना हक्क ना स्वातंत्र्य ना अधिकार तिला दिले,
स्त्री म्हणून फक्त कर्तव्याचे डोंगर तिला दिले.
कुठल्याच निर्णयात ना कधी सामील केले तिला,
अन्नपूर्णा म्हणवून फक्त किचन तिला दिले.
पतीला परमेश्वर मानूनच जीवन जगले तिने,
गृहलक्ष्मीचे उगा मोठे बिरूद लावून तिला दिले.
नऊ महिने सारं सोसून उदरात वाढविले तिने,
मुलाला बापाचे नाव-गाव लावून तिला दिले.
सुंदरतेची मूर्ती म्हणून वाहवा केली तिची,
मूर्ती झाकण्या पदर नि हिजाब तिला दिले.
लढली कैकदा हर एक पायरी चढण्याकरिता,
आदिशक्ती म्हणून की काय संघर्ष तिला दिले.
प्रगतीची चढली पायरी तरी बेडीत अडकलेली,
"घर" नावाचे तुरुंग जणू आंदण तिला दिले.
तारेवरची कसरत तिची नाही संपायची कधी,
तळ्यात नी मळ्यात एवढेच जगणे तिला दिले.
माहेरही परके, सासरही न अपुले अशी दशा तिची,
कधी आपले न झालेले दोन उंबरठे तिला दिले.
ती जननी, ती भगिनी, प्रेयसी ती, पत्नी अन माता,
आयुष्यभर बस नात्यांचे गुंफण तिला दिले.
खांद्याला लावून खांदा तीही झिजली घरासाठी,
शेवटी कर्ता हा पुरुषच हे पटवून तिला दिले.
