निरागस बालपण
निरागस बालपण
हसत खेळत जगायचे , तेही काय दिवस होते...
आभाळाची स्वप्नं , मन फुलपाखरामागे वेडे होते
फुंकर मारून उडणारे , कागदाचे विमान होते,
वाऱ्याचा वेग अन गगनात आमचे पाय होते
आजीच्या गोष्टीमध्ये , आटपाड एक गाव होते,
कल्पनांना आमच्या आणिक पऱ्यांचे पंख होते
गळ्यात गळे घालून फिरणारे जिवाभावाचे दोस्त होते,
वेळ येता तेच कुणाचा गळादेखील पकडत होते
पाठीवरल्या दप्तराचे तेवढेच काय ते ओझे होते,
ना आजची चिंता तेव्हा , ना उद्याचे कोडे होते
आतुरतेने वाट बघणारे मोकळे एक मैदान होते,
दिवसभरच्या गोंगाटाने गाव सारे हैराण होते
रडण्याचे निमित्त नव्हते , न हसण्याचे कारण होते,
षडरिपुंपासून अलिप्त निरागस ते बालपण होते
