प्रीतीचा अंकुर
प्रीतीचा अंकुर
यौवनाचा भार देही, नवीन तुजला होता ।
प्रीतीचा अंतरी तेव्हा, अंकुर रुजला होता ।।1।।
शुभ्र दुधी कौमुदीचा, देह धुंद तेजवाही ।
पाहून साज निराळा, शृंगार लाजला होता ।।2।।
आस्तिक मीही त्यजिले, सारे तेहतीस कोटी
सांग तुजविण देव, कोणता पुजला होता? ।।3।।
विरघळवूनी मज, मधुलावण्यद्रावणी ।
गुंगवून ठेवण्याचा, तो छंद तुजला होता ।।4।।
भरगच्च माळलेला, फुललेला निशिगंध ।
गंधासह कुंतलात, हा जीव गुंतला होता ।।5।।
अर्धोन्मिलित नयनी, कुंद संधिप्रकाशात ।
भिजवून सर्वांगाला, काळही थिजला होता ।।6।।
वसंत येई बहरा, रंगीत इशारे दावी ।
तव स्तवणासाठीच, कोकीळ गुंजला होता ।।7।।
अल्लड क्रीडेत जेव्हा, नकळत स्पर्श झाला ।
बकुळ पलीकडचा, त्याने गंधाळला होता ।।8।।
सौंदर्यपटलावरी, तवरूप रेखिताना ।
न जाणो ईश्वराहाती, कोणता कुंचला होता ।।9।।
