प्रेम(धरणी आणि पाऊस)
प्रेम(धरणी आणि पाऊस)
धरणी म्हणाली पावसाला....
अरे सख्या या वेड्या माणसांसारखं तु आता वागू नको/
तुझ्या लबाडीवर विश्वास ठेवील मी, असं तु समजू नको//
पदरी पडलं पवित्र झालं, असं मी कधीच म्हणणार नाही/
पण सात जन्म हाच प्रियकर मिळू दे, असं ही सांगणार नाही//
पाऊस म्हणाला...
रुसलोय गं मी त्या माणसांसारखा, म्हणून येणार नाही/
माझ्या मागन्या मान्य झाल्याशिवाय तुला भेटणार नाही//
धरणी म्हणाली..
काय तुझी मागणी आहे, आता ती तरी कळू दे/
सकून चालली काया माझी, ओलावा तरी मिळू दे//
पाऊस म्हणाला....
ओसाड झालीत रान, झाड झूडपं तोडून नेली/
भेटायचं म्हटलं चोरून तुला, तर आहे कुठं सावली//
धरणी म्हणाली....
अरे माणसानी तोडली झाडं, त्याला मी काय करू/
तुझ्या प्रेमासाठी माझा, जीव लागलाय झुरु//
पाऊस.....
म्हणूनच मी रुसलो आहे, हे तुला समजतं नाही/
खोड मोडल्याशिवाय ही माणसं, सुधारणार नाही//
धरणी......
माणसांची जिरीवण्यासाठी, तु मला त्रास देणार/
माझा जीव गेल्यावर सांग, तुला काय मिळणार//
पाऊस....
मला काय मिळणार हे, तु आता सांगू नको/
निर्लज्य माणसांसाठी, तुझा माझा वाद नको//
धरणी.....
पण मीच नाही राहिले तर, तु कसा येणार/
पाण्याची वाफ होऊन तू, मेघ कसा होणार//
पाऊस.....
तूच लाडवून ठेवलस, म्हणून माजलेत सारे/
तुझ्या उरावर बसून बांधतात, हे बंगले अन घरे//
धरणी.....
तु येतोस ओरडत तेंव्हा, वाहून नेतोस की सारे/
तरी पुन्हा पुन्हा ही माणसं, बांधतात कशी घरे//
पाऊस.....
म्हणूनच मी आता यांना, धडा शिकवायचा ठरवलंय/
त्यांचीच युक्ती वापरून मी, रुसून आता बसलोय//
आता बांधा म्हणावं बंगले, अन करा म्हणावं विकास/
नाही पिकणार शेती, सण जीवन होईल भकास//
