पंखात वारं भरल्यावर
पंखात वारं भरल्यावर
पंखात वारं भरल्यावर,
पिल्लं राहतच नाही आपली.
अंगातली मस्ती नाही बसू देत स्वस्थ.
सुरुवातीला बरं वाटतं,
कोवळ्या पंखाच्या टुणटुण उड्या,
ते पडणं, धडपडणं,
आपण बघत बसतो कौतुकानं.
वाटतं, कधी घेतील ही आभाळ कवेत?
आपण जी स्वप्ने पाहिली
पिल्लांच्या संगोपनात जी अर्धवट राहिली,
करतील का ती पूर्ण?
आपण अजूनही त्यांना पिल्लूच समजत असतो
आणि बघता बघता क्षितिजापार होतात
कधीच परत न फिरण्यासाठी.
काडी काडी जमवून बांधलेलं घरटं
आता खायला उठतं.
आपण असे एकाकी, बावरलेले
अजून काय करू शकतो?
