पिंपळपान
पिंपळपान
पिंपळाचे पान जोपर्यंत देठाशी जोडलेले असते
ताजेतवाने राहून जिवंतपणा अनुभवते
परंतू एके दिवशी अचानक ते गळून पडते
आणि त्याचे अस्तित्वच जणू संकटात सापडते
काळाच्या ओघाने त्यावर जाळी निर्माण होते
हवेची एखादी मंद झुळूकही त्याला दूर नेवून टाकते
हिरवागार देठ पानाचा , सुकून काळा पडतो
अन् अशा रीतीने त्याचा मुळाशी संबंध तुटतो
अशीच स्थिती किंबहुना नात्यांची असते
एकमेकांच्या सोबतीनेच परिपक्व होत जाते
पण या संबंधांंमध्ये जेव्हा गाठ पडते
सोडवण्यास ती गाठ , हृदय पिळवटून निघते
अगणित झटापटी , जीवाचा आटापिटा करूनही
सगळेच प्रयत्न निष्फळ ठरतात केव्हा तरी
गुंफलेल्या आठवणींचे तेव्हा होते उजाड रान
आणि काळीज बनते शेवटी रखरखीत पिंपळपान !!
