फुलांपासून मिळणारी शिकवण
फुलांपासून मिळणारी शिकवण
फुले ही नाजूक कोमल निरागस
क्षणभंगूर जीवन असले तरी
आपल्या सुगंधाने सर्वत्र
शिंपतात जसे अत्तर
कळी कळी उमलून शृंगार करतात
विविध रंगात रंगुनी सर्वांना उल्हासित करतात🤗
कोणी नसले आपल्यासाठी तरी
आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर ही फुले
आपल्याला शिकवून जातात
भेदभाव न करता सर्वांनाच सारखा
सुगंध देऊन जातात
कधी केसात माळली जातात तर कधी
प्रभू चरणी अर्पण केली जातात
मन प्रफुल्लित करून गहिवर दुःख ही विसरण्यास क्षणात भाग पाडतात आपल्या सौंदर्याने सर्वांच्याच मनाला भुरळ पाडतात, अशी ही परिसरातील फुले जीवनात आपल्याला खूप काही शिकवून जातात☺️
सुगंध आरास फुलांची असे जगावे स्वच्छंद
सांगून जातो अंगणात फुलणारा जास्वंद 🌺🌺🌺🌺
हिरव्यागर्द पानांमध्ये किती खुलून दिसतो
तरीही स्वतःचा बडेजावपणा
सांगायचा नसतो
सद्गुणांचा सुगंध मैलांवरून ही येतो
अंगणात फुलणारा मोगरा मनमुराद
जगायचं जेव्हा सांगून जातो
तप्त उन्हाळ्यातही संकटांना सामोरं जाण्याची
व्यथा आणि वेदनेला झुगारून,
अप्रतिम कला
ही तुझी गुलमोहर वसंत फुलोरा फुलवण्याची
तुला पाहुनी कवीला सुचे रे कविता
प्रेमिकांच्या प्रीतीवर तुझीच रे सत्ता
आधी काटे मग गुलाब
काटे रुपी दुःखातही राखावा रुबाब
आधी कष्ट मग सुख हे शिकवतो आम्हास गुलाब तू 🌹🌹
दोन दिवसांचे जगणे तरीही सुगंध मोहकतो
झाला तुझा श्वास जरी बंद
तुझ्या सद्गुणांचा तुला नाही रे घमंड
पाहुनिया न पाहतो कसे आम्ही अंध
पहाटेची चाहूल लागताच प्राजक्त दरवळतो रे तुझा गंध...
सावळ्या रंगाने हिरमुसायचं नाही तर
गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं
बकुळी सांगते
काट्यात सुद्धा फुलायचं असतं...
अंधाराला घाबरायचं नाही तर
काळोखात ही फुलायचं असतं
रातराणी सारखं अगदी आनंदाने सर्वत्र दरवळायच असतं..
सुख दुःखातही सदैव उमलून बहरत फुलायचं असतं
सदाफुली सारखं धुंद होऊन
जगायचं असतं
चिखलात ही स्वतःची सांकेतिक रचना करून स्वबळावर उभे राहायच असतं
संकटातही चिखलात बुडून न जाता
संकटांना बुडवुन कमळा सारखं
फ़ुलायचं असतं...
आज मनी हसला, हसला लाज लाजून केवडा देखोनिया सुमनांचा
प्रीत सुगंध सोहळा🌷🌹🌼🌻🌺
या रंगीबिरंगी फुलांच्या विश्वात
मंद सुगंध दरवळतो
परिसरातील फुलांचा हा सोहळा स्वच्छंद
आणि मनमुराद जगण्यास
कळी सारखे उमलुन फुलां सारखे फुलत जाण्यास आपल्याला सांगतो 😊
