पायवाट
पायवाट
चालताना पायवाट
रेंगाळते आज मन
जरा मागे पाहताना
आठवती काही क्षण ।। १।।
साथ तुझी होती मला
जीवनाच्या प्रवासात
हात हाती होता सदा
ऊन, वारा, पावसात।। २।।
आयुष्यात होत्या झळा
होता कठीण प्रवास
झाली सावली तू सखे
वाटे स्वर्गाचा आभास ।। ३।।
क्षण सारे तुझे माझे
साठवले मी मनात
श्वास माझा आहे तुझा
सामावली तू हृदयात।। ४।।
बदलले क्षण आज
नाही आता तुझी साथ
चालताना पायवाट
क्षण माझे विरहात ।। ५।।