आई मला वाचव
आई मला वाचव


रोज बोलायची माझ्याशी
आज मग तू शांत का?
मुलगी आहे गर्भात म्हणुनी
तुझा असा आकांत का?।।१।।
कुरवाळणारे रोज मला
हात तुझे दूर का?
घरामध्ये आज असा
नाराजीचा सूर का?।।२।।
अंत माझा करण्याचा
दिवस घरात ठरतोय
कसं सांगू आई तुला
जीव किती गं घाबरतोय।।३।।
साद घालू तुला किती
आई हाक ऐक ना
जन्माला यायचंय मला
बाबांना तू समजाव ना।।४।।
प्रेम, लाड काही नको
सहानुभूती थोडी दाखव
रोखू नको श्वास माझा
आई मला वाचव।।५।।