STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy

3  

Vijay Sanap

Tragedy

शेतकऱ्याचा पाळणा

शेतकऱ्याचा पाळणा

2 mins
14.3K


पहिल्या दिवशी राजा शेतकरी

त्याच्या पोटाला नाही भाकरी

रात्रं दिवस करी चाकरी

जो बाळा जो रे जो ।।१।।


दुसऱ्या दिवशी करून मेहनत

राबराबतो उभ्या उन्हात

घाम गाळतो रोज रानात

जो बाळा जो रे जो ।।२।।


तिसऱ्या दिवशी मिरग छाया

सुखावली त्याची पाहून काया

काळ्या धरणीवर करतो माया

जो बाळा जो रे जो ।।३।।


चवथ्या दिवशी पावसाच्या सरी

राजा बांधतो सपान उरी

माझ्या शेतात पेरीन तुरी

जो बाळा जो रे जो ।।४।।


पाचव्या दिवशी लावून कपाशी

बाप झोपतो रोज उपाशी

कर्जाचा डोंगर होता उशाशी

जो बाळा जो रे जो ।।५।।


सहाव्या दिवशी चाले तिफणं

नाही पाऊस कोवळे उनं

बाप माझा हा गेला बावरुन

जो बाळा जो रे जो ।।६।।


सातव्या दिवशी घालून खत

माय निंदते घेऊन पाथ

वर पहाता पाणी डोळ्यात

जो बाळा जो रे जो ।।७।।


आठव्या दिवशी पेरुन साळ

महापुराचा घुसला गाळ

केला जाहीर ओला दुष्काळ

जो बाळा जो रे जो ।।८।।


नवव्या दिवशी लावून मका

एका पावसाने दिलाया धोका

कसा व्यापारी साधतो मोका

जो बाळा जो रे जो ।।९।।


दहाव्या दिवशी आलं सरकार

त्याच्या शेतावर मारली नजर

खाऊन गेले कोंबडे चार

जो बाळा जो रे जो ।।१०।।


अकराव्या दिवशी आली चौकशी

त्याच्या घराची केली हराशी

बापाने झाडाला घेतली फाशी

जो बाळा जो रे जो ।।११।।


बाराव्या दिवशी विजू बोलला

आत्महत्या मार्ग नाही चांगला

मुला बाळाला वनवास आला

जो बाळा जो रे जो ।।१२।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy