व्यथा एका झाडाची माणसांसारखीच....
व्यथा एका झाडाची माणसांसारखीच....


पर्णहीन एक झाड
दिसे उजाड उजाड
कधीकाळी छेडायाचा
वारा त्याला उनाड
जेव्हा होती शितल छाया
तेव्हा पाखरे नांदली
आज रित्या झाल्या फांद्या
सारी पांगली पांगली
कधी किलबिल ऐकुनी
झाडं जाई बहरूनी
आज आवाज येईना
गाणी विरली विरली
पाखरांना दिला आसरा
झळ नाही लागू दिली
ऊन ,वारा, पावसात
काया झिजली झिजली
काळ चाले पुढे पुढे
झाड जागीच उभे
सोबतीच्या पाखरांनी
साथ सोडली सोडली
जसा पेटतो वणवा
जीव जातो जळूनी
दुःख एकटेपणाचे
लागे जिव्हारी जिव्हारी
नका ठेऊ देह माझा
झाड बोले गहिवरूनी
झाली मातीही परकी
नाळ तुटली तुटली