पालखी...
पालखी...
पायरीवर तुझ्या ठेवली पालखी
विठ्ठला सार्थकी लागली पालखी
आज आत्म्याविना देह अगतिक किती
चार खांद्यावरी चालली पालखी
ना समजणार मोजून गर्दीस या
भावनांनी किती वेढली पालखी
जन्म वारीच असतो असे जाणुनी
मी दिशेने तुझ्या काढली पालखी
श्वास भोईप्रमाणे खऱ्या वागला
वेदना सोसुनी वाहली पालखी...
एक श्रावण तिच्या अंतरी गोंदला
होउनी चिंब मग लाजली पालखी
जन्मभर सोसतो दाह ज्याच्यामुळे
त्या उन्हाचीच तर सावली पालखी
