ओढ पावसाची...
ओढ पावसाची...
मनाला या ओढ पावसाची...
पावसात चिंब चिंब भिजण्याची...
श्वासांना मुग्ध करणाऱ्या मृद्गंधाला अनुभवण्याची.....
मनाला या ओढ पावसाची...
चिखलात पाय तुडवून
उंच उंच उड्या मारण्याची....
होड्या करुनी कागदाच्या
पाण्यात सोडण्याची....
मनाला या ओढ पावसाची...
जुन्या आठवणींत नव्याने रमण्याची....
जुन्या आठवणींत रमता-रमता
नव्या आठवणींना साद घालण्याची....
मनाला या ओढ पावसाची...
मोत्यांचं शेतशिवार
वाऱ्यावरी डोलण्याची....
आनंदाश्रुंनी सुखावलेला
बळीराजा पाहण्याची...
मनाला या ओढ पावसाची...
तहानलेल्या चातकाची
तहान शमलेली पाहण्याची....
पाणी पिणाऱ्या चातकाला
डोळे भरून पाहण्याची...
मनाला या ओढ पावसाची...
सुकलेल्या वेली
हिरव्यागार पाहण्याची....
कोमेजलेल्या कळ्या
आनंदाने उमलण्याची....
मनाला या ओढ पावसाची...
प
िसारा फुलवून
थुई थुई नाचणाऱ्या मोराची...
मंद-मंद वाहणाऱ्या
त्या अवखळ वाऱ्याची....
मनाला या ओढ पावसाची...
कोकीळेसम मधूर स्वरात
कुहू कुहू करण्याची....
पायातील पैंजणांचा
तो छुमछूम करणारा नाद
पावसाच्या सरींसमवेत ऐकण्याची....
मनाला या ओढ पावसाची...
एकांतात, खिडकीपाशी
उभं राहण्याची....
स्वतःशीच हरवलेला संवाद
पुन्हा नव्याने साधण्याची...
मनाला या ओढ पावसाची...
कुणाची तरी आतुरतेने
वाट पाहण्याची...
चिंब चिंब भिजताना तयाला
घट्ट मिठी मारण्याची....
मनाला या ओढ पावसाची...
कडक चहा अन् ती
वाफाळणारी कॉफी पिण्याची...
मैत्री आणि प्रेमाची
सुरेल मैफिल रंगवण्याची....
मनाला या ओढ पावसाची...
नात्यांचा नव्या सरीत बरसण्याची...
दु:खे सारी विसरूनी
खळखळून हसण्याची....
मनाला या ओढ पावसाची
मनाला या ओढ पावसाची...!!