निवडुंग
निवडुंग
वाळवंटी उन्हामध्ये
आहे उभा निवडुंग
जगण्याच्या लढाईत
चढवितो सारे रंग ||१||
अंगावर काटे माझ्या
बोचण्याची आस नाही
पाण्याविना राहण्याचा
मला मुळी ध्यास नाही ||२||
लाल नाजूक फुलांचा
आहे मीच थोर धनी
एकटाच उगवतो
ओसाड या माळरानी ||३||
नाही जिद्द सोडलेली
हिमतीने मी पाहतो
माझ्या आसऱ्याला येता
अभयाचे दान देतो ||४||
किती घातले कुंपण
तुच्छतेने का पाहता
रक्षणास उभा इथे
तेव्हा सुखाने राहता ||५||