निसर्गाच्याही प्रेमात पडावे
निसर्गाच्याही प्रेमात पडावे
हिरव्या हिरव्या माळरानात कस्तुरीमृग होऊन धावावे
तर कधी मयुरासम पिसारा फुलवून थुई थुई नाचावे
कधीतरी या निसर्गाच्याही प्रेमात पडावे
कोसळणार्या पाऊसधारेत चिंब चिंब भिजावे आणि ओल्या मातीचा मोहक सुगंध होऊन सर्वत्र दरवळावे कधीतरी या निसर्गाच्याही प्रेमात पडावे
कधी सुखद सावली कधी उन्हाचे कवडसे व्हावे
नको शहाणे हे जग आभासाचे
अल्लड निरागस ते वेड जपावे
कधीतरी निसर्गाच्याही प्रेमात पडावे
चाफा होऊन कधी आयुष्य आपले मोहक करावे
कधी होऊन लाजाळू अंग अंग शहारावे
शुभ्र शुभ्र धबधब्यासवे उंच कड्यावरून कोसळावे तर कधी क्षणिक सप्तरंगी इंद्रधनू बनून मन मोहरावे
कधीतरी निसर्गाच्याही प्रेमात पडावे
निळाशार नभामध्ये विहंग बनूनी क्षितीजापर्यंत झेपवावे तर कधी होऊनी फुलपाखरू फुलांसोबत गोड हसावे
कधीतरी आपण या निसर्गाच्याही प्रेमात पडावे
अनंत आभाळाप्रमाणे त्याच्यावरही नितांत प्रेम करावे..
