नातीगोती
नातीगोती
डोकावून पाहिलं आज सहज अंतर्मनात
म्हटलं नात्यांचं गणित घेऊ जरा ध्यानात
आपलं कोण परकं कोण जरा हिशेब लावू
नात्यांची ही बेरीज जरा सोडवून तर पाहू!
नात्यांची बेरीज तर भली मोठी झाली
मोजदाद करतांना खरी तारांम्बळ उडाली
किती सारी नातीगोती आणि बरेच सखे सोबती
हिशेब लावताच मनाला तो हर्ष झाला किती!
म्हटलं पाहू यांची खरी आयुष्यातली भागीदारी
सुखात आणि दुःखात किती आपल्या सहभागी
सुखात जमले थोडेथोडके दुःखात वजाबाकी
प्रगतीच्या मार्गांवरले मोजले शून्य राहिली बाकी!
म्हटलं हीच का आयुष्यातली असतात खरी नाती
जेवढी दिसतात चकाकणारी तेवढ्याच सम वाती
पाहू जाता जितके नजीक अंतर भासे अधिक
दुरुनी डोंगर दिसें साजिरे जवळूनी फक्त क्षणिक!
