मैत्री
मैत्री
मैत्रीचा कट्टा आता येत नाही बहरून
सारी मंडळी इथली गेली आहेत हरवून
वेगवेगळ्या वाटांनी उडून गेली सारी
झाली आहे सुरु साऱ्यांच्या आयुष्याची दुनियादारी
बरा होता कट्टा, मस्त, छान रंगायचा
छोट्याश्या ही विनोदावर खळखळून हसायचा
कधी असायचे टोमणे, कधी असायचे टोले
जखम एकाला, मात्र डोळे साऱ्यांचेच व्हायचे ओले
कधी खूप भांडण, कधी खूप वाद असायचे
पण क्षणभर विश्रांतीनंतर सारे एकत्रच हसायचे
रुसवा, फुगवा, अबोला, बऱ्याचदा असायचा
कधी कधी हा कट्टा मग एकाकीच राहायचा
आतुर व्हायचे पण सारे एकमेकांच्या भेटीसाठी
झालं गेलं विसरून जाऊन भेटायचेच दिवसाकाठी
मैत्रीच्या या बागेत मात्र फुले आता फुलत नाहीत
मैत्रीची ही बाग पुन्हा आता बहरत नाही
सांगावा धाडा कुणी जिवाभावाच्या सख्यांना
कट्ट्यावर या पुन्हा जमुनी भेटा एकमेकांना
सुख, दुःख एकमेकांची मग जाणून घेता येतील
पुन्हा एकदा एकमेकांसाठी हात हाती येतील....
