शब्द... पुस्तकात असतात
शब्द... पुस्तकात असतात
पुस्तकं........ बोलत नाहीत
त्यातील "शब्द" संवाद साधतात वाचणाऱ्याच्या मनाशी.....
आणि...
शब्द.... पुस्तकात असतात
पानाच्या धवल पार्श्वभूमीवर
उमटलेली पुस्तकातली....
ती...... सावळी "शब्दबाळं"
आपल्या ........मोहक, सर्वव्यापी,
"सखोल" अर्थानं......
वेड लावतात जीवाला.....
कुरवाळतात..... गोंजारतात... वाचताना हळूच... आपला "गालगुच्चा" घेतात.... आणि आपणही.... खुदकन असतो स्वतःशीच....
ही किमया शब्दांचीच..... आणि
....शब्द पुस्तकात असतात
कधीकधी..... त्या कृष्णरंगी... वर्णाक्षरांचे विचारमोती पाहता-पाहता शिकवून जातात........
विज्ञान आणि आयुष्याचं तत्त्वज्ञान सहज गवसते.......
चिंतनमाणकांची खाण पावलापावलावर.... आपसूकच...
पदरात पडतं... व्यासंगाचं दान.....
शब्द साधनाच देते शहाणपण... कारण.....
शब्द ..... पुस्तकात असतात
कधीकधी पुस्तकातले शब्द..... शहाणपणा शिकवता-शिकवता
चुचकारतात.... फटकारतात....
दटावतातही...... मग....
उभे करतात......
आपल्यासमोर.... आपल्यालाच नग्नावस्थेत.....
आपल्या लाज शरमेची..... बोबडी वळलेली असते....
गतकालातील..... स्वतःचं आपमतलबी रूप पाहून....
मग घृणा वाटते आपलीच.....
दुसऱ्याचं काळीज.......
रक्तबंबाळ करणाऱ्या.....
भूतकाळातल्या स्वतःच्या
"त्या" हीन मनोवृत्तीची....
मग आपल्या मनात...
आंदोलनं होतात .....
फिर्यादी, पोलीस,....
वकील, न्यायाधीश...
आणि आरोपीही असतो....
आपणच
....... आपणच आपल्याला
सुनावतो शिक्षा......
देऊन टाकतो फाशी....
कारण.......
स्वतःला न फसवण्याचं "खरेपण" शब्दांनीच शिकवलेलं असतं....
आणि शब्द.... पुस्तकात असतात
बाबांचे... आबांचे,
काकांचे.... लोकांचे,....
माईचे.... आईचे...,
ताईचे आणि बाईचेही
कधीतरी ऐकलेले शब्दच....
आपली सोबत करतात
धास्तावलेल्या, बावरल्या.....
क्षणाला ......आणि....
कोमेजलेल्या, खंतावल्या मनाला थोपटत राहतात....... हळुवारपणे
तर.... कधीकधी प्रलयंकारी....
जग बेचिराख करू शकणार्या
"अणू" सारखे स्फोटक शब्दच असतात.....
आणि शब्द...... पुस्तकात असतात
तुम्ही आम्ही... निर्माण करू शकतो शब्द...... मात्र....
त्यांना सांभाळणं....???
मानवाचं काम नाही....
म्हणूनच..... पुस्तक लिहिली गेली... आणि..... म्हणूनच...
शब्द..... पुस्तकात असतात
शब्द....... पुस्तकात असतात...!!!
