वेळ
वेळ
माणूस झालाय माजोरी
झालाय त्याला उन्माद
साऱ्या पृथ्वीतलावर
मांडलाय त्याने ऊच्छाद
डोंगर फोडतोय झाडे तोडतोय
जंगलाला लावतोय वणवा
पुढच्या पिढीला मग होईल
साऱ्याच गोष्टीची वानवा
उरी फुटेपर्यंत धावतोय
कोणासाठी थांबत नाही
पाठीमागे राहिलेल्यांची
त्याला मुळीच पर्वा नाही
कोणासाठीही त्याच्याकडे
नव्हता वेळ
कोणाच्या मरणाला
कोणाच्या तोरणाला
देण्यासाठी नव्हता वेळ
आता निसर्गाने मांडलाय
आपला खेळ
माणसापाशी आता
राहिला वेळच वेळ
कसा वेळ घालवावा
आता याची चिंता लागली
माणसा तुझी परवड
तू स्वतः केली
निसर्गाशी नाते जोडा
तो तुम्हाला सांभाळूनर घेईल
नाहीतर पुढच्या पिढ्यांवर
वारंवार अशी वेळ येईल