जीवनाचे घड्याळ
जीवनाचे घड्याळ


जीवन एक घड्याळ आहे, तीन काट्यांचे,
नका दवडू वाया, क्षण हे मोलाचे!
बालपण हा सेकंद काटा, निसटून जातो धरू पाहता,
मागे मागे धावत जाता, फुलपाखरासारखे!
गोड खाऊ अन् कौतुकाचे, खेळ किती ते मजेमजेचे,
अजून वाटती हवेहवेसे, क्षण आनंदाचे!
मिनीट काटा जवानीचा, स्पर्श रेशमी मोरपीसांचा,
खावे प्यावे मजा करावी, अन् ईश्काची चव चाखावी!
जपून ठेवा ही सुखाची, प्रेम शिदोरी नवलाईची,
न संपावा काळ खरोखर मखमली तारूण्याचा!
तास काटा वार्धक्याचा, नाही जात वेळ त्याचा,
उठता बसता चालता येईना, डोळ्यांनाही नीट दिसेना!
दुर्धर जडती रोग शरीरी, पैसा नसता कुणी न विचारी,
कंटाळवाणे जीणे भयंकर, भोगण्यावाचून नसे गत्यंतर!
आहारावर नियंत्रण ठेऊन, व्यायामाची चावी देऊन,
गजर नामाचा चालू ठेवा, त्या घड्याळ निर्मात्याचा!
दुर्दैवाने जरी बिघडले, नसे कोणी वाली त्याचा,
बहु किंमती हे घड्याळ आहे, म्हणून मानवा सावध राहा रे!
|| जीवन एक घड्याळ आहे ||