गीत साजिऱ्या सुरांचे
गीत साजिऱ्या सुरांचे
आषाढाच्या मुक्तसरींनी, हिरवे झाले रान उभे
हरिततृणाचे तोरण लेवून, तरुवेलींची शाख सजे
श्रावणातल्या जलथेंबाचे, मनमोहक हे गीत असे
झुकता पश्चिमेस नजर जराशी, इंद्रधनू ते खास दिसे
उघडून येता ही घनमाला, थोडे जेव्हा ऊन पडे
शहारून इवले तृणपाते, हर्षून पाहे चोहीकडे
नदीकाठचा पारिजात तो, पाहून जरासा फुललेला
प्रेमदास तेथे गुंतती सवे, घेऊन आपल्या ललनेला
सायंकाळी कुरणांवर गायी, हूड होऊन हुंदडती
चातकांसह धुंद पाखरे, गाणी गाऊन बागडती
कृष्णधवल हा रंग घनांचा, सूर्यास्तासह रंगतसे
लतावृक्षिका पानगळीची, नक्षी मार्गी सांडतसे
हवेत इथल्या गंध सांडती, भिजून फुलल्या फुलांचे
सरींत इथल्या तृप्त नाहते, गीत साजिऱ्या सुरांचे