पुन्हा प्रेमात आहे मी
पुन्हा प्रेमात आहे मी
नव्या ध्यासात आहे मी, नव्या रंगात आहे मी..
गुलाबी गोड ओठांच्या, पुन्हा प्रेमात आहे मी..
कशाला शोधिसी ऐसे, मला होऊन तू वेडी..
तुझा मी जाहलो आता, कुठे माझ्यात आहे मी..
नभीच्या तारकांना ही जराशी आर्जवे माझी..
इथे ही रात्र थांबू द्या तिच्या स्वप्नांत आहे मी..
अता ना बोलणे भेटी, कसा ये रंग मेंदीला ..
तिला सांगू नका अजुनी , तिच्या रक्तात आहे मी..
दिवसभर घालिसी माळा कशाला पत्थरांना तू ..
प्रभू तुज सांगतो आहे, तुझ्या हृदयात आहे मी ..
उगा जाती जमातींची, मला दावू नका पत्रे ..
खऱ्या माणूसधर्माच्या, खऱ्या रुपात आहे मी ..
(रसिक हो दुःख माझे ही, विषारी वृक्ष झालेले
सुखाची वेल मिळते का, तिच्या शोधात आहे मी)