निमित्त
निमित्त
निमित्त ना उरले बाकी, कुठलेही जगण्यासाठी
तरी न दारी मृत्यू मजला, आला बघण्यासाठी
जीवना अता घे आवरता, झाला पुरे पसारा
पहा न उरला अवकाश अता, नभा उजळण्यासाठी
तुझ्या स्मृतींच्या अश्रूंत प्रिये मी, नित्य चिंब भिजतो
हवे कशाला श्रावण मजला, देह भिजवण्यासाठी
पश्चातापे म्हटले मी मग, जाऊ पाठी थोडे
मला न दिसली वाटच तेव्हा, मागे वळण्यासाठी
भास तुझे ते सरले जे या, हृदयी वसले होते
नकोस बोलू दर्पणातून, अता फसवण्यासाठी
स्वस्थ सुखाची सखोल थोडी, मिळेल जेथे निद्रा
पलंग मजला मिळेल कोठे, ऐसा निजण्यासाठी
गगन भेदण्या पुन्हा उभारा, पंख नव्या जोमाने
जन्म तुमचा नसे केवळ, मातीत मिसळण्यासाठी