नारी
नारी
नारीशक्ती तू कुलस्वामिनी
तुझ्या उदरी जन्म घेउनी
लाभले आयुष्य भूलोकी
झाले भाग्यवान या जीवनी
असुनी स्त्रीगर्भ तू प्रसवलेस
बाळगली नाहीस तमा समाजाची
तुझ्या कृपेने मी जन्मले
घेईन प्रतिज्ञा मी प्रबोधनाची
मी तुझी लाडकी कन्या
तू माझी वात्सल्यमूर्ती आई
तुझ्या प्रेमाने तृप्त झाले
होऊ कशी मी उतराई
झिडकारुनी तें समाजबंधन
ठाकलीस तू समाजविरोधी
बाबा आजी आजोबांच्या नाही
घाबरलीस धमकीला कधी
मोठी होऊन तुला दाखविन
भरारी माझ्या कर्तृत्वाची
सांभाळीन मी जीवनभर
तुजला भीती नको कुणाची
केलेस उपकार मजवर आई
दिलास जन्म तू या जगी
विसरणार नाही तुझे हें ऋण
जपेल जीवापाड ही पोरगी
