आला कंटाळा
आला कंटाळा


खूप झाली सुट्टी आई
आलाय तिचा कंटाळा
कधी होईल सुरु आमची
रोजची भरणारी शाळा
एक वर्ष झाले लागला
शाळेला मोठाच टाळा
घरातच झालो बंदिस्त
उघडावी आता शाळा
वाट पाहते बालकांची
कोराच राहिलाय फळा
बागडतीलच शाळेमध्ये
फुलवती ज्ञानाचा मळा
शाळेतले लाकडी बाक
पडलेत आता धूळखात
विद्यार्थी बसले घरातच
करीत कोरोनावरी मात
रडणार नाही आता मी
उठले जर हातावर वळ
करीनच गृहपाठ नित्य
येऊ दे हातालाही कळ
जाऊया गं आई दोघेही
पाहायला उघडी शाळा
विचारेल प्रेमाने मजला
कसा आहेस रे तू बाळा
अंतर ठेवूनी बसू सारेच
शाळेतल्या त्या बाकावर
नको करूस चिंता आई
भोळ्या मनाला तू आवर
>नाही सुट्टीला जात गावी
बसलोय सारेजण घरात
नसेल झुक झुक गाडीची
कोकणात जाणारी वरात
येतेय मामाची आठवण
पिकलेत हे आंबे हापूस
विचार करूनीच माझ्या
झाला डोक्याचा कापूस
वाट पाहते आजी गावी
सुट्टीला बोलवलेय मला
कंटाळा आलाय गं खूप
आजीकडे जाऊया चला
तळ ठोकूनी हा कोरोना
बसलाय इथे पाहा आता
काय काढावा हो पर्याय
झालीय सर्वांनाच चिंता
इवलासा कोरोना विषाणू
डोळ्यांना नाहीच दिसत
तरी कसे कोण जाणे हा
ठेवतोय जीवाला खिसत
कसली अशी देवा शिक्षा
दिलीस मानवी जीवाला
अचानक मारतोय धडक
लागले सारेजण भ्यायला
नकोच वाटतो हा मोबाईल
हवी मित्र-मैत्रिणींची साथ
वाटतंय कोरोना राक्षसाला
पळवू दूर मारून एक लाथ