नवरा बायकोचे भांडण
नवरा बायकोचे भांडण


खरंच सांगते लागले एकदा
नवराबायकोचे असे भांडण
हमरीतुमरीवर आले दोघेही
जणू उखळातीलच कांडण
कोणीच थांबेना भांडायचे
शेजारीपाजारी जमले सारे
अफवाकंड्यांची चर्चा होत
पसरले सगळीकडेच वारे
एकाने मात्र धाडस करून
विचारले भांडणाचे कारण
बायको बोले तावातावाने
चढलेच वीरांगणेचे स्फूरण
ठेवलेय चिकन शिजवूनी
बोलतात हे भरवतो तुला
शिजवले मी त्यांच्यासाठी
कसे जाईल आधीच मला
माझे म्हणणे त्यांनी खावे
त्यांना वाटते पहिले मीच
वादावादे होई विषयांतर
खाईना कुणीही आधीच
घेतला शेजाऱ्यांनी मारूनी
कपाळावर आपलाच हात
लाडाचे भांडण ऐकुन बोले
काढावा तोडगा तुम्ही यात
गेले निघून आपापल्या घरी
नवराबायको बसले खायला
पातेलं दिसलं रिकाम त्यांना
शेजाऱ्यांनी फडशा पाडलेला