मुक्तछंद बालपण
मुक्तछंद बालपण
हवेत झुलते हलके खांदे भार न त्यावर किंचित सा
आसमंत कुशीत घेण्या पदर पसरता इवल्या करांचा
डोळ्यांत खोलवर उठून दिसणारे गोंडस हास्य
तो निरागस चेहरा जणू किमया निसर्गाची सुरेख
निखळ आनंदी नटलेले मुख सौंदर्याची परिभाषाच जणू
अडखळत्या चालीत एक निराळा डौल
अन् प्रत्येक पाऊल ऐटदार
त्या पावलांचे इवले ठसे पावलांशी जोडणे असो
किंवा पावसाळ्यात साचती छोटी तळी उडी मारत ओलांडणे असो
ती प्रत्येक कृती एक मौज होती जी आज कंटाळवाणी भासते
उलट्या- पालट्या आगळ्या- वेगळ्या जीवनाविषयीच्या कल्पना निराळ्या
त्यात वास्तव काही नसे परंतु वास्तव्य असे आनंदी उत्साहाचे
जो प्रेरित करे वेध घेण्या प्रत्येक बाबीच्या मुळाचा
टुणुक टुणुक भोपळा अन् चतुर कावळा
आणि कावळा म्हणताच आठवते शेणामेणाच्या घरांची गोष्ट
किती साऱ्या त्या रोचक गोष्टी ज्या एक मेजवानीच होत्या मनाला
पण आज त्या अल्लड आनंदाला काही आठवणींच्या पेटीत कायमचेच कोंडून ठेवले आपण
उघडून ती पेटी, उधळून तो आनंद
विसरून काही काळासाठी आयुष्याचे अनपेक्षित आघात
प्रत्येक दुःखाची करून मस्करी
साजरे करूया दररोज ते मुक्तछंद बालपण
जे आवाज देतंय मागून , त्या बंद पेटीतून
