मृत्यूचा तमाशा
मृत्यूचा तमाशा
बसलो होतो असाच एकदा
अचानक समोर आला यम
आताच चल माझ्यासोबत
देवू लागला मला दम
हडबडून त्याला म्हणालो,
" असा अचानक आलास कसा?"
माझी लेकर उघड्यावर पडतील
वेळ तरी दे मला जरासा...."
ऐकून माझ बोलण
यम खदाखदा हसला
तुझ्यावाचून कोणाच नाही अडत
चल दाखवतो तुला.....
नको नको म्हणत असताना
त्याने प्राण माझा घेतला होता
आत्मा तिथेच घुटमळत होता
तमाशा मृत्युचा पाहत होता
सारे नातेवाईक जमा झाले
त्यात काही दुश्मण पण होते
खूप चांगला माणुस होता
माझ्या नावाने गळा काढत होते
माझ्या मुलांची अवस्था बघून
मला खूप गलबलून आल
काय होईल माझ्याविना
उगाच अस वाटून गेल
माझ्या जाण्यानंतर लगेच
संपत्तीच्या वाटण्या झाल्या
वादावादित काही गोष्टी
हमरी तुमरी वर गेल्या
लाडाची लेक समजत होतो
ती आईची दागिणे घेवून बसली
आता कशाला लागणार तुला
हिश्या साठी अडून बसली
सगळ्याच वागण बघून
जीव माझा तुटत होता
खर दुःख बायकोलाच
असा माझा भ्रम होता
शिरून तिच्या मनात मी
ऐकल तिच्या मनातल
यांच करून करून थकले
आता कुठे जरा निवांत
म्हटल मी यमाला लवकर
घेवून चल इथून मला...
नर्कातच राहत होतो अजून
आतातरी स्वर्गात ने मला.....
