मृगजळ
मृगजळ
सहस्त्राकार वलयांची रास दूर सजलेली,
तेजस्वी किरणांच्या स्पर्शाने गंधाळलेली.
फसव्या जळाची फसवी आकृती,
नजरेच्या सीमेपार त्याचीच पुनरावृत्ती.
का असे ओढ आभासी जळाची,
शमेल का कधी तृष्णा वेड्या मृगाची?
कधी थांबेल हा निरर्थक प्रवास,
अकल्पित गोष्टींशी जोडलेली आस?
चंदेरी आरास मृगजळातली,
क्षणैक शमवी तृष्णा काळजातली.
व्यर्थ पाठलाग अवास्तव प्रतिमांचा,
तरीही शोध त्या अदृश्य किनाऱ्यांचा.
हरवले अस्तित्त्वही किनारे शोधताना,
तरीही चाले अखंड संघर्ष सेतू सांधताना...