गरीबी
गरीबी
हजार दुःखे पाठीशी ही आयुष्याला शाप जणू,
सोसताना चटके तयाचे मन वेदनेने लागे कण्हू.
दोन वेळच्या तुकड्यापायी लाचारीचे येथ धडे,
कशी विझावी आग जीवाची गरीबाला या प्रश्न पडे.
मिळेल का तो घास आजचा, विवंचना ही गरिबाची,
घामाच्या थेंबातून त्याच्या, भरती पोटेे धनिकाची.
गरिबीचा हा सोस केवढा, जिवंतपणीही मरण यातना,
कशी सुटावी जगण्यासाठी, अन्नाची ही नित्य साधना.
तप्त निखारे महागाईचे, भर त्यातही महामारीची,
कशी सावरावी विस्कटलेली, लक्तरे ही गरिबीची.
कोडगा हा संसार आणि कोडगी ही दुनियादारी,
गरिबीची ही खोल दरी अन् श्रीमंतीची मक्तेदारी.
बहुरूपी ही दुनिया सारी, मुखवट्यांचे उलगडेे न कोडे,
सहवेदनाही नसेच कोठे, माणुसकीचे ढोंगही थोडे.
सुटेल कधी हे दुष्टचक्र अन् भ्रांत भाकरीची,
का असेल भाळी कायमची ती रेेघ चाकरीची !!