व्यथा शेतकऱ्याची
व्यथा शेतकऱ्याची
काळी माती माझी आई, आभाळ माझा बाप,
त्यांची कृपा मजवरी, येतं पीक वारेमाप.
माझ्या घामातून पिके, माझं हिरवं शिवार,
ऊन, वारा, पावसात, कधी मानली न हार.
उभ्या जगाचा पोशिंदा, पिकवतो धनधान्य,
शासनाच्या दरबारी, पिकाला भाव का अमान्य?
चालले वर्षानुवर्ष, कर्जमाफीचे धोरण,
कधी लागेल माझ्या दारी, माझ्या कष्टाचे तोरण.
आहे माझाही संसार, आहे भरलं गोकुळ,
आत्महत्येच्या विचाराने, जीव होतो हा व्याकूळ.
दैव माझं विपरीत, आहे कष्ट दिनरात,
खातो चटणी भाकरी, शेतकऱ्याची ही जात.
कधी असे महापूर, कधी कोरडा दुष्काळ,
हाती लागे न काहीही, उजाडे रानमाळ.
माझं साकडं देवाला, मिळू दे मला न्याय,
कष्ट येऊ दे फळाला, जगणं न व्यर्थ जाय.