छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला
थोर , धुरंधर राजा ,
दिला ज्याने जन्म
अद्वितीय हिंदवी स्वराज्या .
पराक्रम, किर्ती अन्
यशोदुंदुभी दर्यापार गाजे,
असे ते वीर शिवाजी राजे !!
गुलामगिरीचे पाश तोडूनी
स्वदेश प्रेम निर्मिले मनी ,
स्व अस्मितेची ज्योत पेटवूनी
स्वराज्य प्रेम जागविले जनी.
जागविले मावळ्यांतले
सळसळते रक्त ताजे,
असे ते वीर शिवाजी राजे !
मानून माय- बाप रयतेला
दिला फाटा अन्यायाला ,
शत्रूसही मानून आपले
जागले अखिल मानवतेला.
अतुलनीय पराक्रम ज्याचे
शत्रूही धजण्यास लाजे ,
असे ते वीर शिवाजी राजे !!
दूरदृष्टी नि गनिमीकावा
वाटे ज्याचा गनिमांस हेवा,
जिंकले कैक गड नि किल्ले
जे सदैव अजरामर राहिले.
ऐकता शिवबा नाव तयाचे ,
शत्रू गोटातही खळबळ माजे ,
असे ते वीर शिवाजी राजे !!
शोधून अस्तनीतले निखारे
गनिमांस दाखविले दिवसा तारे ,
घोडदौड विजयी हिंदुत्त्वाची
कथा ही रयतेच्या राजाची .
मुघल, परकीयांस शह देऊनी ,
गनिमांसही पाणी पाजे ,
असे ते वीर शिवाजी राजे !!