मराठी अस्मिता
मराठी अस्मिता
जिजाऊपुत्र शिवबाने
हिंदवी स्वराज्य स्थापिले।
संत तुकोबा, नामा, चोखोबाने
अभंग विठ्ठलाचे गायिले।।
"ज्ञानोबा माऊली तुकाराम",
ऐकू येती अभंगाच्या ओळी।
प्रातःकाळी सडासंमार्जन करुनी
घरापुढे शोभे सुंदरशी रांगोळी।।
शुभंकरोती, रामरक्षा मुले म्हणती
मंद प्रकाश देई तुळशीपुढे दिवा।
मुले वंदिती वडिलधाऱ्यांना
नात्यामधला हा अवीट गोडवा।।
नऊवारी लेऊनी, नथ शोभे नारीला
धोतर सदरा, मर्दाच्या मस्तकी टिळा।
प्रेमाने वंदिती पंढरीच्या कुलदैवतासी
विटेवरी उभा तो विठोबा सावळा।।
देशभक्तांना प्रेमाने करू या वंदन
होऊन गेले टिळक, गोखले, सावरकर।
वाहून घेती जीवन सारे खेळ, कलेवर
पु ल, सचिन अन् लता मंगेशकर।।
माजघरात सारवलेली चूल मातीची
गोड तिच्यावरची आमटी भाकरी।
सणासुदीला असे पुरणपोळी
चटणी भाकरीची गोडी न्यारी।।
वाहत असे शांत सुगंध मंद वारा
संध्येला गुरांबरोबर शेतकरी येई घरा।
रात्री वारकरी घेऊनि मृदुंग टाळ वीणा
अभंग गोड गाती विठ्ठलाचे बसुनी मंदिरा।।
