मलाही एकदा पाऊस व्हायचं आहे
मलाही एकदा पाऊस व्हायचं आहे
मलाही एकदा पाऊस व्हायचं आहे
मातीत मिसळून गंध उधळायचा आहे
एकरुपतेचा धुंद सुगंध साऱ्या
आसमंतात पसरवायचा आहे...
मलाही एकदा पाऊस व्हायचं आहे...//1//
ओथंबलेल्या मेघांमधून धरणीवर
मनसोक्त बरसायच आहे.,...
तिच्या कुशीत लपलेल्या बीजांना
हळूवार,लुकलुकत अ़ंकुरण्यासाठी
भिजावायचं आहे...
मलाही एकदा पाऊस व्हायचं आहे....//2//
प्रेमधारांचा वर्षाव करीत
मनामनातील प्रेमाला फुलवायचं आहे
मनातील मोरपीसी आठवांना
अलगद जागवायचं आहे
मलाही एकदा पाऊस व्हायचं आहे....//3//
झाडाच्या पानांवर खेळत
मोती बनायचं आहे
निथळणाऱ्या माझ्याच थेंबांना
बालमनात जपायचं आहे
मलाही एकदा पाऊस व्हायचं आहे...//4//
आकाशात इंद्रधनुष्य बनून
कवी मनात फुलायचं आहे
माझ्या अन् धरतीच्या प्रेमाच्या
रचनांना आकार द्यायचा आहे
मलाही एकदा पाऊस व्हायचं आहे...//5//
डोंगर माथ्यांना चुंबून
धो धो कोसळायचं आहे
खळाळत जाऊन, नदीत मिसळून
सागरात एकरुप व्हायचं आहे...
मलाही एकदा पाऊस व्हायचं आहे..//6//
सागरातील माझ्या रुपाला
उन्हात सुकवायचं आहे
वाफ होऊन आकाशात जाऊन
पुन्हा पुन्हा धरणीस माझ्या भेटायचं आहे...
मलाही एकदा पाऊस व्हायचं आहे...//7//...
