मिटून
मिटून
मी मिटून घेतो
करकचून डोळे
बघत नाही इथे तिथे
कितीही ओलावल्या
आणि जड़ावल्या
पापन्या तरी..
सहन करतो भोवतालच्या
प्रसंग आणि
प्रत्येक क्षणाचे
बलात्कार
करुण घेतो नित्यनेमाने
सृजनाचा
शुक्राणु घुसला नसल्याची खात्री
गर्भात..
झोपतांना, झोपल्यावर उठतांना,उठल्यावर,
चालतांना, बोलतांना, फिरतांना,
मागे लागलेल्या शब्दांना
घेत नाही कधी उचलून
नेत नाही त्यांना कवितेच्या गावात
पोटातली जळजळ,
मळमळ
तिच्या पोटात टाकुन
मी वेगळा होईनही
पण तीचे
प्रश्नांनी गर्भार राहिलेले पोट
प्रसवेल का?
उत्तराचे लेकरु घेऊन
याची खात्रीच नाही
म्हणून....