मित्रा जगणं सोडू नको
मित्रा जगणं सोडू नको


वादळं लाख येतील जातील
यशापयशाचे खेळ रंगतील
संकटांचे पहाड कोसळतील
त्यांनी खचून जाऊ नको
मित्रा जगणं सोडू नको
कोणी तुझं हृदय तोडतील
कोणी तुझ्या भावनांशी खेळतील
आशा निराशेचे मळभ दाटतील
पण आयुष्यात हरु नको
मित्रा जगणं सोडू नको
भविष्याच्या चिंता जाळत राहतील
भूतकाळाच्या आठवणी छळत राहतील
वर्तमानाचा गुंता सुटणार नाही
त्यात अडकून पडू नको
मित्रा जगणं सोडू नको
एखादा प्रश्न काळजात घर करेल
जीवन-मरणाचा प्रश्न ठरेल
उत्तर मात्र सापडणार नाही
त्याच्या मागे लागू नको
मित्रा जगणं सोडू नको
प्रत्येक रोगावर औषध असतं
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं
आजची वेळ उद्या राहत नाही
यावरचा विश्वास मोडू नको
मित्रा जगणं सोडू नको
कितीही मोठं संकट येवो
कितीही काळी रात्र जावो
सूर्य उगवायचा राहत नाही
हे सत्य नजरेआड करू नको
मित्रा जगणं सोडू नको
मनात काही ठेवू नको
स्वतःशी कुढत राहू नको
प्रियजनांशी संवाद साध
स्वतःला शिक्षा देऊ नको
मित्रा जगणं सोडू नको
राग आला तर बोलून टाक
नाही आवडलं तर सांगून टाक
मन मोकळं करून टाक
जास्त विचार करू नको
मित्रा जगणं सोडू नको
सगळं काही परत मिळेल
हरवलेला सूर पुन्हा सापडेल
पण गेलेला जीव येणार नाही
टोकाचा निर्णय घेऊ नको
मित्रा जगणं सोडू नको
जेव्हा मनावर मळभ दाटेल
आयुष्यात सर्व निरर्थक वाटेल
कोणासाठी जगावं ते कळणार नाही
तेव्हा हिंमत सोडू नको
मित्रा जगणं सोडू नको
जन्म घेशील पुन्हा अनेक
पण मनुष्य जन्म लाखात एक
संधी मिळतील पुन्हा कित्येक
अर्ध्यावर डाव मोडू नको
मित्रा जगणं सोडू नको
मित्रा जगणं सोडू नको...