माणूस
माणूस
अंतर वाढतच चाललंय
माणसा माणसा मधलं
दरी रुंदावत चाललीये
खोल खोल
हाकेच्या अंतरावर असूनही
कधी ओळखता आल्या
नाही प्रियजनांच्या भावना
आधी मनाने मग शरीराने
निघून गेला खूप दूर दूर
स्वतःच्याच नादात
पोहत राहिला प्रवाहाबरोबर
निरंतर
ओढ नव्हती अस नाही
माणसाची माणसाला
पण गृहीत धरत राहिला
प्रत्येक नात्याला
वेळ काढला नाही
कधीच कुणासाठी
आता मात्र वेळच वेळ
आहे त्याच्यापाशी
पण......
नियतीलाच आता मंजूर नाही
माणसाला माणसाच्या
स्पर्शाची मुभा नाही
खळखळून मित्रांशी हसणं
अन नकळत हातावर टाळी देणं
ठरू लागलंय आता जीवघेणं
एक जादुकी झप्पी
मायेनं घेतलेली पप्पी
याची सर कशालाही नाही
मात्र साध्याश्या या गोष्टीलाही
मुकलाय माणूस
खूप गर्व होता
स्वतःच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा
पण त्याचं स्वातंत्र्यासाठी
आज निसर्गापुढे झुकलाय माणूस
वाटतंय भविष्य अंधारात आहे
पण मनात आशा जिवंत आहेत
जर का या संकटातून
तरलाच माणूस
तर जन्माला येईल एक
वेगळाच माणूस
भावनांचं मोल आणि
अंतरीचे बोल
जाणणारा माणूस
प्रकृतीचा आदर करणारा माणूस
जीवाला जीव देणारा माणूस
सर्वांना आपलंसं करणारा माणूस
साधासुधा
बाहेरच्या झगमगटाला
न भुलणारा माणूस
स्वतःच्या घरात रमणारा माणूस
खरंच एवढं तरी शिकेल का
माणूस?
