महामारी
महामारी
अदृश्य, अकल्पित, वेदनादायी जन्म-मृत्यूच्या रेषेवर नेऊन ठेवणारं
अण्वस्त्रापेक्षा ही नरसंहारक प्राणहरणास्त्र
विषाणूंची बाधा : नृशंस करोना कोविड-१९ !
आज कशालाच माणूस नाही घाबरत
पण - हयाच्या चाहुलीने, नुसत्या कल्पनेनेही मनात भयगंड
नळया फोडण्यासाठी हपापलेली माणसं
बघतही नाहीत मटण दुकानाकडे
दहशतवादापेक्षा प्राणघातक, महामारी कोरोना ||१||
आहे तरी केवढा मृत्यूचा जबडा?
आपल्या विनाशकारी राक्षशी पंजाने
विळखा घातलाय साऱ्या जीवसृष्टीला.
नाही दया माया त्याला कुणाचीच
जात, धर्म, देश, लिंग, राव-रंक
कोणीही बाधित झाला तो संपला.
मृत्यूचा आकडा वाढतोय रोज
घेतलाय धसका प्रत्येकानं
मन व्हेंटिलेटरवरच आहे जणू .
कापरं भरतंय शिंक-खोकला आला तरी
अफाट मानवी कोल्हाळात
टाळणार कशी गर्दी ?
भरणार कसं पोट ?
शिस्त आणि नियम धाब्यावर बसविण्याची जुनी खोड जात नाही ! ||२||
माणूस आणि कोरोनाचं, महाभयंकर युद्ध थांबणार कधी ?
वैश्विक आपत्ती टळणार कधी ?
प्रादुर्भाव वाढतोय, स्तब्धपणे नाश बघतोय
किती दिवस जगायचय मरण छायेत ?
नशीब हा व्हायरस मोबाइलमध्ये नाही शिरला ! ||३||
भांबावलो तरी डगमगणार नाही
मोडलो तरी वाकणार नाही,
आम्ही मागेही हटणार नाही
तू कितीही थैमान घातलंस तरी लक्षात ठेव करोना ! आव्हाने पेलण्याची
जन्मजात जबरदस्त ताकद आहे आमच्यात
युद्धनीती चांगली जाणतो आम्ही ! ||४||
निरपराधांचे बळी घ्यायला तू आलास परदेशातून
तू एक विषाणू, पण निक्षून सांगतो तुला
मी एक संशयित रुग्ण.... वाळीत पडलेला.
तुला आम्ही जेरबंद करू,
इंजेक्शनच्या सिरिंज मधे अथवा डाळी एवढ्या गोळीमध्ये
आमचा निकराचा लढा ,अथक प्रयत्न, संशोधन आणि सावधानता, नक्कीच तुला नेस्तनाबूत करील
आमच्या नसानसातली रग ,सहनशक्ती, त्वेष, चीड, ठेचून काढील तुला
यशस्वी होऊ नक्कीच आम्ही ||५||
संशयाची झाकोळ, स्मशान शांतता
दूर करू आम्ही, भ्याड ठरवू तुला.
नवे क्षितीज, नवा सूर्य बघू उद्या
निरामय होऊन आनंदी जीवन जगू उद्या
भेदाभेद, वाद-विवाद,
जात -धर्म सध्या बाजूला बांधून ठेवलेत आम्ही
आमची एकजूट दाखवून देऊ तुला करोना,
तुला ठार करून, गाडून पुरता गाळून मगच गप्प बसू.
प्रत्येक जण बिथरतोय पण धडाडीने जगतोय
असे कितीतरी विषाणू पचवलेत हया मानव जातीने तिथे तुझी काय मजाल?
अब्जावधी हात सरसावलेत, भाले घेऊन तुला भोसकायला.
आमचा नाही, तुझाच अंत जवळ आलाय
करोना, कोरोना, कोविड-१९ ।।६।।
