मायमराठी
मायमराठी
माय मराठी सजली
मराठी गालीच हासली
माय नाकी नथ घाली
मराठी नऊवारीत शोभली....!
माय हिरव्या चुड्यांची
मराठी खणखण वाजी
माय पैजण छुम छुम
मराठी कुंतल्यात अबोली....!
माय कुंकूवाच्या घेर्याची
मराठी भाळीच शोभली
माय कर्णफूलांचा साज
मराठी माझी गं देखणी....!
माय समशेर उराशी
मराठी धारदार शब्दांची
माय सोज्वळ रुपाची
मराठी लाल काळ्या हो रुपाची....!
माय मराठी मराठी
तेज लकाकी लकाकी
माय मराठी वर्हाडी
माय अहिराणी मराठी....!
माय अंगाई बाळाची
मराठी कणखर बाणा
शिवाजी राजा माझा इथं
मराठीचाच गं राणा....!
माय जात्यावरली ओवी
मराठी मायभाषेचा गं साज
सार्या जगामंदी बाई
माझ्या मराठीचाच बाज...!
माय विनय शालीन
मराठी परखडं उबदार
अश्वा अंकुश लाविती
माझा मराठी सरदार...!
माय संस्कारी मायाळू
मराठी अजोड, कनवाळू
माय रीतभात जशी
मराठी जणू गं जिव्हाळू...!
माय शिदोरी गं अशी
माझ्या मराठी परी गं
जन्मभरी पांग फेडीन
माझ्या मराठी भाषेचं.....!
