मायेची ऊब
मायेची ऊब
मायेची ऊब...
थंडी कडाक्याची, जनजीवन गारठवी।
काळ्या - कभिन्न , अर्ध्या रात्री, ऊब मायेची हवी॥
रस्त्यावरचा अंधार निर्मितो काळजात भीती।
गरीब, ते असहाय्य लेकरू, शोधी आईची प्रीती॥
आईची ममता कशी अशी ही, दूर सारी लेकरा।
भूक पोटाची भागवण्याला, शोधी कुठे आसरा॥
शरीर विकून ती आणी अन्न, जे पूर्ण परब्रह्म।
बाळाला आपल्या जेवू घालणे, हेच निष्काम कर्म॥
पोटाची भरली खळगी, लेक विसावला मांडीवरी।
थंडीपासून रक्षण करण्या, निज पदर पांघरी॥
दूर कोठे पेटली शेकोटी, उजेड अंधुकसा दिसे।
बाळाला धरून छातीशी, माय काळोखी वाट चालतसे॥
आईचे धरून बोट हातामध्ये, बाळही आश्वासला।
नाही जगी ह्या एकटाच मी, विश्वास मनीं जागला॥
काळोखातही चिंता विसरवी, मायेची उबदार शेकोटी।
बाळाचा चेहरा हर्ष भारला, मातेस वाटे आनंद पराकोटी ॥
