माय
माय
1 min
283
माझ्या मायेचा संसार ,
तिनं थाटला नेटका ..
ठिगळ्यानं शिवतेया ,
तिचा संसार फाटका ..॥१॥
माय रांधते भाकर ,
माया पिठात मळते ..
आयुष्याच्या वणव्यात
माय एकटी जळते ..॥२॥
काटा पायात रूतला ,
माय चाले अडवाणी..
गड संसाराचा चढे ,
माय माझी हिरकणी ..॥३॥
नयनाच्या उदकानं ,
माझी झोपडी भिजते ..
भरवुनी मला घास ,
माय उपाशी निजते ...॥४॥
खूप सोसलं सोसलं ,
तिच्या पायालाही भेगा ..
काळजाच्या घरट्यात ,
माझ्या माऊलीची जागा..॥५॥
माय दिसेना घरात,
मन व्याकुळ व्याकुळ...
माय यशोदा देवकी
घर गोकुळ गोकुळ..॥६॥
माय शब्दात मावेना,
माय माय लिहु किती ..
माय स्वर माय सूर,
माय माय गावू किती ..॥७॥