माती या महाराष्ट्राची
माती या महाराष्ट्राची
पराक्रमाने पावन झाली माती या महाराष्ट्राची
तिलक करावा इथे जन्मलो गोष्ट ही सौभाग्याची ।।धृ।।
इथे जन्मले शूर शिवाजी, फुले नि आंबेडकर
क्रांती वीर ते सावरकर अन् टिळक, आगरकर
नित्य स्मरावे या विभूतींना गावी महती त्यांची ।।१।।
ज्ञाना, तुकया, नाथ, नामया, चोखा, सावता, गोरा
मुक्ता, सोयरा, जनीने भक्तीचा पिटला डांगोरा
भक्तीच्या शक्तीने केली जपणूक नीती धर्माची ।।२।।
ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, धनधान्याची शेती
सुपीक माती विविध भाज्या, फुले, फळेही येती
घाम गाळतो, राबतो, करावी कदर शेतकऱ्याची ।।३।।
झरे, निर्झरे, खळखळणाऱ्या नद्या वाहती येथे
बारा बलुते, जाती, धर्माचे लोकं राहती येथे
'प्रेमे रहावे', इथली शिकवण संत सज्जनांची ।।४।।
दया, भावना, शौर्य, पराक्रम, भाट पोवाडे गाती
'देश विकासा साठी धावतो' याची दिगंत ख्याती
कधी न थकावी महती गाता वाणी 'पंडिताची' ।।५।।
