STORYMIRROR

Sanket Potphode

Inspirational Others

3  

Sanket Potphode

Inspirational Others

माणूस

माणूस

1 min
327

गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधत होतो

देवळाच्या गाभाऱ्यातल्या देवाला मात्र मी ओळखत होतो

माणसाच्या माणुसकीची गोष्ट कधी माहितीच नव्हती

देवाच्या देवपणाची कथा मात्र लहानपणीच ऐकली होती


माणसाला मदत करताना सोय मी पाहिली होती

देवाची पूजा मात्र सांजसकाळ मांडली होती

माणसाला माणसाच्या आधाराची गरज का बरं भासेल

जेव्हा फक्त भक्ती करून देव आपल्यासोबत असेल


सर्व काही करूनही जेव्हा भेट आमची झाली नाही

तेव्हा गाभाऱ्यातला तो म्हटला, 'गर्दीतल्या माणसांतला देव तू जाणलाच नाहीस,

मी तिथे गर्दीत होतो माणसांमधल्या देवासोबत आणि

तू इथे गाभाऱ्यात होतास माझ्यापाशी माणूस शोधत,

मी काय माणूस आहे की मी तुझ्या मदतीला येईन

हां पण एवढं मात्र सांगतो, माणसातल्या देवाला नक्कीच पाठवीन

तेव्हा माणसातलं देवपण तू शोधत रहा

मी देवातलं माणूसपण तुला दाखवत रहातो'


गाभाऱ्यातून बाहेर पडलो तेव्हा देव माझ्यासोबत होता

आणि गर्दीतला तो माणूस माझ्याकडे पाहून हसत होता

त्याचं ते हसणं आता केविलवाणं वाटत नव्हतं

त्याला तसंच सोडून पुढे जायला मन माझं ऐकत नव्हतं


केली जेव्हा त्याला मदत मी, पाठीवर कोणीतरी थाप मारल्याचा भास झाला

जेव्हा त्या माणसाने हातात हात घेऊन म्हटलं अगदी देवासारखे धावून आलात

तेव्हा तो गाभाऱ्यातला देव माझ्या कानात कुजबुजला,

माणसातला देव आज तू खास झालास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational